पुणे – महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक ट्रस्ट स्थापन करण्यात आला असून, त्याची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आली आहे. पण, यात पक्षनेत्यांना स्थान देण्यात आले नाही. सत्ताधारी पदाधिकारी, विरोधी पक्षनेत्या आणि अतिवरिष्ठ अधिकारी यांचा ट्रस्टमध्ये आहे.
हे वैद्यकीय महाविद्यालय प्रत्यक्ष साकारण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या मान्यतेचा अर्ज गेल्या आठवड्यात मुंबईत वैद्यकीय शिक्षक संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. आरोग्य विद्यापीठाकडेही या संस्थेकडेही हा अर्ज दाखल करण्यात आला आहे.
महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, विरोधी पक्षनेत्या, पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, आरोग्य प्रमुख यांची न्यासाचे सदस्य म्हणून नोंदणी झाली आहे. परंतु, कॉंग्रेस, शिवसेना, मनसे, एमआयएम या पक्षनेत्यांची मात्र सदस्य म्हणून नोंदणी करण्यात आली नाही. या नेत्यांचा समावेश करण्यासाठी स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.