कोपर्डे हवेली -शिरवडे रेल्वे स्टेशन येथील करोनाबाधित परिवारास मुस्लिम बांधवांनी मदत केली. श्री गणेशमूर्ती, प्रसाद, किराणा माल अशा स्वरूपात मदत करून हिंदू मुस्लिम ऐक्याचे अनोखे उदाहरण दिसून आले.
शिरवडे रेल्वे स्टेशनवर एक करोनाबाधित रूग्ण सापडला. शेजारीच राहणाऱ्या मोहसिन संदे यांनी किराणामाल आणून दिला. नंतर याच घरात दुसरा रूग्ण सापडला. त्यामुळे येथील वातावरणात चिंतेची आणखी भर पडली. पहिल्या रूग्णाचा पॉझिटिव्ह अहवाल रात्री उशिराने मिळाला.
हे समजताच मसूर येथील चिनार मेडिकलचे दिलावर सुतार व त्यांचा मुलगा मुबीन यांनी आवश्यक औषधोपचाराच्या गोळ्या तब्बल रात्री साडेअकरा वाजता पोहोच केल्या. सुतार कुटुंबियांनी मसूर व परिसरातील ग्रामपंचायतींना आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या मोफत वाटल्या आहेत.
दुसऱ्या दिवशी मुबीन व सद्दाम यांनी बाजारपेठेतून बाधित कुटुंबातील तरूणास व्हॉटसऍप वरून फोटो पाठवून श्रीगणेशमूर्ती ठरवली. लागणारे पूजा साहित्य, मोदकही आणले. जातीय तेढ, आकस आपण कित्येकदा ऐकतो, पहातो. पण आजचे उदाहरण नक्कीच बेमिसाल ठरेल.
शिरवडे स्टेशन येथील जमाल संदे, वासिम संदे, हरूण संदे, शब्बीर संदे, रियाज संदे, इरफान संदे, शौकत संदे, रज्जाक संदे यासर्व मुस्लिम बांधवांनी मदत व विचारपूस करून हिंदू मुस्लिम ऐक्याचे चांगले उदाहरण निर्माण केले आहे.
श्रीगणेशाची मूर्ती पोहोच करताना आजचा आनंद वेगळाच होता. निसर्गाने एक संधी दिली आहे. असाच सलोखा सर्वत्र राहिल्यास वाद होणारच नाहीत.
– मुबीन सुतार मसूर