पुणे – करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना सुचवण्यासाठी “आयसर’ आणि टाटा संस्थांना अहवाल देण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार बुधवारी हा अहवाल विभागीय आयुक्त यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने दोन महिने शाळा-महाविद्यालये बंद ठेवणे, लग्न समारंभ, मॉल, हॉटेल आदी गर्दीच्या ठिकाणी निर्बंध लावायचे हे उपाय सुचवले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार लॉकडाऊन लावले जाणार नाही, मात्र कडक निर्बंध लावण्याची शक्यता आहे. याचा अंतिम निर्णय शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीमध्ये होणार आहे.
उपरोक्त दोन्ही संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात गर्दी होणाऱ्या प्रमुख घटकांवर लक्ष देण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये दोन महिन्यांपर्यंत प्रायोगिक तत्वावर बंद ठेवली तर नव्या करोना बाधितांच्या संख्येत 35 टक्के घट होईल. जर रेस्टॉंरंट, मॉल आणि बार बंद ठेवले तर बाधितांची संख्या 20 टक्क्यांनी कमी होईल. जर रेस्टॉरंटमधून पार्सल सुविधा उपलब्ध करून दिली, तर बाधितांची संख्या 15 टक्क्यांनी घटेल, अशा अंदाज व्यक्त करण्यात आला. याविषयी या संस्थांनी बुधवारी सुधारित अहवाल सादर केला आहे. तो पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत सादर केला जाणार आहे.
सध्यस्थितीत दि.14 मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश आहेत. हॉटेल्सदेखील रात्री 11 वाजेपर्यंत सुरू आहेत. यांसह रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना संचारबंदी आली. याबाबतचा पुढील निर्णय शुक्रवारी होणार आहे.