राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवारांचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली : हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली तर हिवाळी अधिवेशनानंतर 23 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले. मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर करण्यात यावा अशी अपेक्षा सर्व आमदारांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसची आज दुपारी बैठक होणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. तसंच, शरद पवार या बैठकी दरम्यान कर्जमाफीसंदर्भात आपले म्हणणे मांडतील आणि काय निर्णय घ्यायचा हे ठरवतील असे देखील त्यांनी सांगितले.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये त्यांनी हिवाळी अधिवेशनानंतर दोन दिवसांच्या आत मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल असे सांगितले होते. तसंच, राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्रिपदे ही फक्त राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्यांनाच दिली जातील, इतरांचा विचार होणार नाही, असे त्यांनी सांगितले होते.