पुणे – विषय समित्यांच्या निवडीच्या विषयात भाजपचा काहीच संबंध नसून शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणाचा भाग असल्याचे, उत्तर देत महापौर मुक्ता टिळक यांनी शिवसेनेबरोबर भाजपचे बिनसले नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला. याशिवाय यामध्ये त्यांच्या अंतर्गत वादाचा भाग असल्याचे सांगून या विषयाला वेगळेच वळणही दिले. यावेळी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे उपस्थित होते.
महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे. शिवसेनेला विधी अथवा क्रीडा समितीच्या अध्यक्षपदासाठी विचारणा करण्यात आली होती. परंतु, त्यांच्या पक्षातील अंतर्गत कारणांमुळे त्यांनी याबाबत निर्णय दिला नाही, असे टिळक म्हणाल्या.
स्थायी समितीमध्ये भाजप शिवसेनेचे बहुमत आहे. स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घेत सहकार्य केले होते. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसलाही दोन विषय समित्यांचे उपाध्यक्षपद घेण्यासंदर्भात विचारणा केली. परंतु, त्यांनीही अनुकुलता दाखविली नसल्याचेही टिळक यांनी सांगितले. त्यामुळे शिवसेनेचा रिस्पॉन्स न आल्याने सर्वच जागांवर भाजपने उमेदवार दिले. प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणुकीचे अर्ज 2 मे रोजी दाखल करण्यात येणार आहेत. 6 मे रोजी प्रभाग समित्यांची निवडणूकही होणार आहे. त्यातही शिवसेनेला प्रभाग समितीचे अध्यक्षपद घेण्याबाबत विचारणा करण्यात आल्याचे टिळक म्हणाल्या.
भाजप आणि शिवसेनेची देशपातळीवर युती झाली असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही जेथे सत्ता आहे, तेथे एकमेकांना सत्तेत सामावून घेण्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर झाला आहे. कोणत्या पदांबाबत निर्णय घ्यायचे यावर लवकरच वरिष्ठस्तरावर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, असे टिळक यांनी नमूद केले.