शहरातील फेज-2 योजनेचा बट्ट्याबोळ

मुदत संपून तीन चार महिने लोटले तरी कामे बाकी; महापालिका पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी लावली वाट

योजनेंच्या कामांबाबत शंका

फेज-2 योजना पूर्ण होईल तेव्हा होईल; पण या योजनेच्या कामांबाबत शंका व्यक्‍त होत आहे. या योजनेच्या कामांबाबत अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या. पण त्या तक्रारीचे निराकरण झाले नाही. उलट योजनचे काम उत्कृष्ट असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. पुढील 30 वर्षांसाठी ही योजना आहे. परंतु शहरातंर्गत काढण्यात आलेल्या पाईपलाइनमुळे ही योजना कुजकामी ठरण्याची शक्‍यता आहे.

नगर – नगर शहराच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी योजना म्हणून पाहिल्या जात असलेल्या शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेचा फेज – 2 पुरता बट्ट्याबोळ झाला आहे. गेल्या साडेआठ वर्षांपासून या योजनेचे काम सुरू आहे. परंतु दरवेळी योजनेचे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगून महापालिकेकडून नगरकरांची दिशाभूलच करण्यात येत आहे. आजवर पाच महापौर झाले तरी एकाही महापौरांना या योजनेचे काम पूर्ण करता आले नाही. ही नगरकरांसाठी शोकांतीकाच आहे. 31 डिसेंबर रोजी योजना पूर्ण करण्याची मुदत संपवून आता चार महिने लोटले तरीही या योजनेचे कामे बाकी आहेत. शहरांतर्गत पाणी वितरण व्यवस्थेचे सुमारे 70 ते 80 किलोमीटरचे काम बाकी असून हे आता कधी पूर्ण होणार हे ब्रम्हदेवाला देखील सांगता येणार नाही, अशी स्थिती झाली आहे.

माजी महापौर संदीप कोतकर यांच्या काळात शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेला सुरूवात झाली. 2010 पासून फेज-2 ही 116 कोटींच्या पाणी योजनेचे काम शहरात सुरू आहे. दोन वर्षे मुदतीत पूर्ण करावयाचे हे काम मागील साडे आठ वर्षात संथगतीने झाल्याने ते करणाऱ्या तापी प्रिस्टेस या ठेकेदार कंपनीला सध्या रोज 70 हजार रुपयांचा दंड केला जात आहे. अर्थात यापूर्वी 60 हजार रुपये दंड होता तो आता 70 हजार करण्यात आला तरी कामे काही संपली नाहीत. पण या योजनेंतर्गत मुळानगर, विळद व नागापूर या तिन्ही उपसा केंद्रांवर वीज उपकेंद्र, ट्रान्सफार्मर, जादा क्षमतेचे उपसा पंप व त्यासाठीच्या वीज मोटारी बसवल्या गेल्याने तसेच विळद जलशुद्धीकरण केंद्रापासून नागापूर उपकेंद्रापर्यंत पाच किलोमीटर अंतरात 600 एमएम व्यासाची रायझिंग मेन पाइपलाइन टाकल्याने मुळा धरणातून शहरात होणारी पाण्याची आवक वाढल्याचे पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे. वसंत टेकडी येथील मुख्य टाकीत नेहमी शून्य ते एक फूट अशी असणारी पाणी लेव्हल आता कायम 4 ते 5 फुट असते. त्यामुळे शहरातील जुन्या पाईपलाईनद्वारे सुरू असलेल्या पाणीपुरवठ्यातही 25 टक्के वाढ झाल्याचे दावा महापालिकेने केला आहे.

फेज- 2 चे काम दरवेळी प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले. परंतू ही योजना कधी पूर्ण होणार हे मात्र अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात येत नाही. आजवरच्या महापौरांनी केवळ योजनेचा आढावा घेतला. परंतू योजना पूर्ण करण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. अधिकारीस्तरावर हे काम चालले. ठेकेदाराला दरवेळी मुदत वाढ देण्यात आली. आतापर्यंत फेज – 2 पाणीयोजनेंतर्गत शहराच्या विविध भागात पाण्याच्या 7 उंच टाक्‍या उभारण्यात आल्या आहेत. त्यापैकी बहुतांश सर्वच टाक्‍यांमध्ये पाणी ओतून त्यांची पाणी चाचणीही घेतली गेली आहे.

या टाक्‍यांपासूनची पाणी वितरण व्यवस्थाही तयार केली गेली आहे. शहरांतर्गत नव्याने 565 किलोमीटरची पाणी वितरण पाइपलाइनचे जाळे निर्माण केले जाणार असून, यापैकी 70 ते 80 किलोमीटर अंतरात असे जाळे निर्माण करण्याचे काम बाकी आहे, हे सर्व काम पूर्ण झाल्यावर या नव्या पाईपलाईनद्वारे पाणी वितरण व नव्याने पाणी कनेक्‍शन्स दिले जाणार आहे. शहराच्या दृष्टीने महत्चाची योजना असतांनाही केवळ राजकीय इच्छाशक्‍ती अभावी ही योजना रेंगाळत असल्याचे दिसत येत आहे.

या फेज -2 ला लागले ग्रहण आता कधी सुटणार असा प्रश्‍न आहे. ही योजना 2010 पासून सुरू झाली. तेव्हापासून संदीप कोतकर, संग्राम जगताप, शीला शिंदे, अभिषेक कळमकर, सुरेखा कदम असे पाच महापौर झाले. आता नव्याने बाबासाहेब वाकळे हे सहावे महापौर झाले आहे. तरी वाढीव शहर पाणीपुरवठा योजना काही पूर्ण झाली नाही. कोतकर वगळता अन्य महापौरांनी केवळ आढावा घेण्याचे काम केले. अधिकारी व ठेकेदाराला पाठिशी घालून ही योजना रेंगाळत ठेवली.

शासनाने देखील वारंवार योजनेबाबत विचारणा केली. परंतू अधिकारी व ठेकेदारांनी शासनाची देखील दिशाभूल करण्याचे काम केले. एवढी मोठी पाणीयोजना महापालिकेला पूर्ण करता आली नाही. त्यामुळे अन्य मोठ्या योजना कशा पूर्ण होणार असा प्रश्‍न आहे. पाणीयोजना पूर्ण न झाल्याने नगरकरांना पाणीपुरवठा होत नाही तरी महापालिका पाणीपट्टी वसुल करीत आहे. आजवर पाच महापौर झाले तरी एकाही महापौरांना या योजनेचे काम पूर्ण करता आले नाही. ही नगरकरांसाठी शोकांतीकाच आहे. 31 डिसेंबर रोजी योजना पूर्ण करण्याची मुदत संपवून आता चार महिने लोटले तरीही या योजनेचे कामे बाकी आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.