इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवला जाऊ शकतो. त्यामुळे त्यांना कोणत्याही सार्वजनिक पदावर राहण्यासाठी अपात्र ठरविले जाऊ शकते, अशी शक्यता देशाचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी वर्तवली आहे. “सायफर गेट’प्रकरणी माजी पंतप्रधान आणि तेहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी राजकीय लाभासाठी उच्चस्तरीय सायफरचा गोपनीय कागदपत्रांचा वापर केला असल्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवला जाऊ शकतो, असे ख्वाजा आसिफ म्हणाले.
राज्यघटनेच्या 6 व्या कलमानुसार ही कारवाई केली जाऊ शकते. देशद्रोहाच्या आरोपाखाली आरोपीला मृत्युदंड आणि आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते, असेही ख्वाजा आसिफ यांनी सांगितले.
या आरोपासंदर्भात इम्रान खान यांचे माजी मुख्य सचिव आझम खान यांनी दिलेला कबुलीजबाब महत्त्वाचा ठरू शकतो. गेल्या वर्षी पंतप्रधान असताना इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या अमेरिकेतील राजदूताने राबवलेल्या गुप्त लिपीतील कागदपत्रांच्या आधारे पाठवलेल्या कागदपत्रांच्या आधारे प्रस्थापित आणि विरोधकांच्या विरोधात बदनामीकारक चित्र तयार केले होते, असे आझम खान यांनी कबूल केले होते. या “सायफर’प्रकरणी इम्रान खान यांना 14 वर्षांची शिक्षा होऊ शकते, असे कायदामंत्री आझम खान यांनीही म्हटले होते.
कारस्थान केल्याचा अमेरिकेवरचा आरोप भोवला
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागले होते. तेव्हा अमेरिकेने आपल्याला पंतप्रधानपदावरून हटवण्यासाठी कारस्थान केल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला होता. अमेरिकेने हा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला होता. आझम खान यांच्या कबुलीजबाबातून गोपनीय कागदपत्रे राजकीय फायद्यासाठी मिळवण्याचा विरोधकांचा आरोप खरा असल्याचे सिद्ध झाले. राजकारणासाठी राष्ट्रीय सुरक्षिततेशी केलेली ही गंभीर आणि अक्षम्य तडजोड आहे, असे ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे.