नवी दिल्ली – केरळचे दिवंगत मुख्यमंत्री ओमन चंडी यांच्याबद्दल आक्षेपर्ह वक्तव्य केल्याबद्दल मल्याळम अभिनेता विनायकन याच्या घरावर पोलिसांनी आज छापा घातला आणि त्याचा मोबाईल फोन जप्त केला. कोची शहरातील कलूर भागातील अपार्टमेंटमधअये पोलिसांनी ही छाप्याची कारवाई केली.
विनायकनविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला जबाब नोंदवण्यासाठी मसन्स बजावले होते. मात्र तो हजर झाला नाही. म्हणून छापा घालून फोन जप्त करावा लागला असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
फेसबुकवर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये विनायकन याने ‘ओमन चंडी कोण होते? त्यांच्या मृत्यूनंतर केरळमध्ये 3 दिवसांचा दुखवटा का जाहीर करण्यात आला होता? ‘ असा प्रश्न केला होता. ओमन चंडी यांच्या अंत्ययात्रेला वारेमाप प्रसिद्धी दिल्याबद्दल त्याने प्रसिद्धी माध्यामांवरही टीका केली होती.
हा व्हिडीओ प्रसिद्ध झाल्यावर विनायकनवर चहुबाजूंनी टीका झाली होती. त्यानंतर विनायकनने फेसबुकवरून आपला व्हिडीओ हटवला होता. मात्र चंडी यांच्याबद्दलच्या टीकात्मक वक्तव्यामुळे केरळ कॉंग्रेसने त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती.