दोन तासात आरोपी गजाआड
पिंपरी – खिडकीचे गज कापून चोरट्यांनी पेट्रोल पंपावरील साडेसात लाखांची रोकड चोरून नेली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत गुन्हा दाखल झाल्यावर भोसरी पोलिसांनी दोन तासांत आरोपींना अटक करून चोरलेली रोकड हस्तगत केली.
नारायण अप्पा पवार (वय 26) आणि रमेश प्रभू पवार (वय 22, दोघेही रा. भारतमाता नगर, दिघी. मूळगाव पाटोदा, बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. भोसरी येथील मुलाणी पेट्रोल पंपाच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी कार्यालयात प्रवेश केला. तेथील कपाटातील साडेसात लाख रुपयांची रोकड चोरून नेली. चोरट्यांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये कॅमेऱ्यावर चादर टाकून खबरदारी घेतली होती.
सहायक निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांनी तपासाला सुरुवात केली असता पेट्रोल पंपावर काम करणारा पवार यांच्या हालचाली वेगळ्या वाटल्याने पोलिसांनी त्याला खाक्या दाखविताच त्याने आपण आणि मावस भाऊ रमेश यांनी मिळून चोरी केल्याची कबुली दिली. भोसरी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत गुन्हा उघडकीस आणून साडेसात लाख रुपयांची रोकड चोरट्यांकडून हस्तगत केली आहे.