डॉक्‍टरांच्या वेतनात 20 हजारांनी वाढ

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात करोनाबाधित रुग्ण वाढत असल्याने त्यांच्यावर उपचारासाठी रुग्णालय व कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. त्यामध्ये आवश्‍यकतेनुसार आणखी वाढ केली जाणार आहे. या ठिकाणी मानधनावर नियुक्त केलेल्या डॉक्‍टरांच्या मानधनात 20 हजार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

महापालिकेचे वायसीएम, भोसरी व नवीन जिजामाता रुग्णालय हे करोना उपचार रुग्णालय आहेत. तर, आकुर्डीतील पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, शाहूनगरचे रिजनल टेलिकॉम सेंटर, किवळेचे सिम्बॉयसिस महाविद्यालय, आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय, मोशीतील आदिवासी विभागाचे वसतीगृह, संत तुकारामनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय, वाकड येथील बालाजी महाविद्यालय, इंदिरा महाविद्यालय, म्हाळुंगे-बालेवाडी येथील क्रीडा संकुल वसतिगृह, मोशीचे सामाजिक न्याय विभागाचे वसतिगृह, म्हाळुंगे-चाकण येथील म्हाडा वसाहत येथे कोविड सेंटर सुरू केले आहे. महापालिकेच्या तालेरा, भोसरी, आकुर्डी, सांगवी, यमुनानगर, थेरगाव, जिजामाता रूग्णालयात अन्य रूग्णांवर उपचार केले जात आहेत. ही रूग्णालये व सेंटर चालविण्यासाठी महापालिकेस मोठ्या संख्येने वैद्यकीय अधिकारी व पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता आहे.

त्यांची मानधनावर 6 महिने कालावधीसाठी नेमणूक करण्यात आली आहे. तसेच, आवश्‍यकतेनुसार आणखी मनुष्यबळ घेतले जाणार आहे. राज्य शासनाच्या 29 मे 2020 च्या निर्णयानुसार शासनाच्या सेवेतील कंत्राटी तसेच, बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ केली आहे. त्यानुसार पालिकेने मानधनावर नियुक्त केलेल्या डॉक्‍टरांचे मानधन 20 हजार रूपयांने वाढविले जाणार आहे.एमबीबीएस व पदव्युत्तर पदवी आणि एमबीबीएस व पदव्युत्तर पदविकाधारक डॉक्‍टरांना 65 हजारांऐवजी 85 हजार रूपये वेतन दिले जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.