पुणे – शहरात मांजरी बुद्रुक व कोंढवा बुद्रुक परिसरात घरफोडीचे प्रकार समोर आले आहेत. या ठिकाणाहून चोरट्यांनी एक लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी हडपसर व कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मांजरी बुद्रुक येथील वेताळ वस्ती येथे राहणारे रवींद्र कुंडलिक तावरे (वय ४६) यांचा बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी ६६ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याचे समोर आले आहे. तावरे हे दोन मे रोजी रात्री फ्लॅट बंद करून बाहेर गेले होते. त्यानंतर सेट्रो करामधून आलेल्या चोरट्यांनी ६६ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. तक्रारदार हे दुसऱ्या सकाळी घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार समजला. याप्रकरणी हडपसर पोलिसांना त्यांनी माहिती दिल्यानंतर त्यांनी धाव घेऊन पाहणी केली. सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा माग काढला जात आहे.
कोंढवा बुद्रुक डमरू हॉटेल समोर रामदास माणिकराव देवरसे (वय ५०) यांचा फोटो स्टुडिओ आहे. १५ एप्रिल रोजी ते फोटो स्टुडिओ बंद करून बाहेरगावी गेले होते. त्यानंतर २९ एप्रिलला त्यांना त्यांचा फोटो स्टुडीओचे शटर उचकटून ७० हजार रूपयांचा कॅमेरा चोरून नेल्याचे समजले. याप्रकरणी त्यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे.