Pune Crime | रामटेकडी परिसरात सराईत गुन्हेगाराला अटक; नऊ गुन्हे उघडकीस

पुणे ( प्रतिनिधी ) : हडपसर परिसरात सराईत गुन्हेगाराला शहर गुन्हे अन्वेषण विभागाने नुकत्याच  बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून घरफोड्या, वाहनचोरयांचे अन लूटमारीचे नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत.

अमरसिंग जगरसिंग टाक ( वय २६, रा. गोसावीवस्ती, हडपसर) हे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार जयपालसिंग उर्फ मोन्यासींग राजपालसिंग टाक फरारी आहे. त्याचसोबतच तिलकसिंग गब्बरसिंग टाक (वय २८, रा. रामटेकडी) व निशांत उर्फ ब्लॅक ननावरे ( वय  २८, रा. ताडीवाला रोड ) या सराईत गुन्हेगारांच्या शोधासाठी शहर गुन्हे अन्वेषण विभागाने विशेष मोहीम जारी केली आहे.

लोणीकाळभोरच्या कदम वाक वस्तीतून गेल्या महिन्यात  एका मोटारचालकाला शस्त्रांचा धाक दाखवून कार पळवून नेण्यात आली. हा गुन्हा अमरसिंग व मोन्यासींग या दोघांनी  केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. अमरसिंग हा हडपसर परिसरात वावरत असल्याची गोपनीय माहिती  शहर  गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट सहाचे पोलीस नाईक नितीन मुंढे यांना मिळाली.

त्यानुसार  पोलीस निरीक्षक गणेश माने, मच्छिन्द्र वाळके, राहुल माने व  त्यांच्या  पथकाने गेल्या गुरुवारी ( दि. २९) शिताफीने त्याला अटक केली.  त्याच्याकडे कसून तपास केल्यावर त्याने हा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. तसेच, लोणी काळभोर, हडपसर, लष्कर, वानवडी, खडकी, कोरेगाव पार्क तसेच पिंपरी चिंचवड परिसरातही गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याच्याकडून एक कार, एक मोटारसायकल, एका मोपेड व तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा साडेसहा लाख रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.