नगर, (प्रतिनिधी) – दुचाकीची चावी बनवणून देतो असे म्हणात घरफोडी करणारा परप्रांतीय आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ४८ तासात जेरबंद केला आहे. त्याच्याकडून ३ लाख ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जगदीशसिंग विक्रमसिंग शिखलीकर, (वय ३२ रा.अंब्रोली, योगीकृपा सोसायटी मकान नं.४९, सुरत, रा. गुजरात) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यास गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता त्याने मागील दोन दिवसापुर्वी नगर शहरातील इंदिर कॉलनी येथे एका घरातुन सोन्याचे चोरी केल्याचे सांगितले. ५३.३०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम हस्तगत करुन जप्त करण्यात आली.
याबाबत आरोपीस तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत. या बाबत तोफखाना पोलीस ठाण्यात किशोर कंत्रोड यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीत म्हटले आहे की, दुचाकीची चावी बनविण्यासाठी कंत्रोड यांनी एका व्यक्तीला बोलावले. त्याने घरातील एखादी कपाटाची चावी असले तर द्या. फिर्यादी यांनी लगेच कपाटाची चावी आणून दिली.
चावी वाल्याने त्यावर हातोडा मारून काहीतरी केले. त्यानंतर कपाटाला चावी येत नाही म्हणून त्याने सांगितले की, मी उघडून देतो असे म्हणत काहीतरी केले. अन हात चलाखीने कपाटातील सोन्याचे दागिने, रोकड लंपास केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार ही चोरी जगदीशसिंग शिखलीकर याने केली असून तो सुरत येथील त्याच्या घरी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पो.नि. आहेर यांनी एक पथक सुरत येथे रवाना करून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीस मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
गुन्हे शाखाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, संदिप पवार, दत्तात्रय हिंगडे, रवींद्र कर्डिले, फुरकान शेख, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड, अमृत आढाव यांच्या पथकाने ही कारवाई केली.