सातारा, {प्रतिनिधी} – चंदननगर (कोडोली), ता. सातारा येथील पांडुरंग त्रिंबक लोटके (वय 66, सध्या रा. गुलमोहर कॉलनी, सदरबझार, सातारा) यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून दोन लाख 29 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही चोरी गुरुवार (दि. 7) ते रविवार (दि. 10) या कालावधीत झाल्याचे लोटके यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिलेेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
लोटके हे काही दिवसांसाठी सदरबझार येथील घरी राहायला आले होते. त्या कालावधीत चोरट्यांनी कोडोली येथील घराचे कुलूप तोडून, सव्वालाख रुपये किमतीचे, पावणेतीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, 40 हजार रुपये किमतीची, एक तोळ्याची सोनसाखळी, 16 हजार रुपये किमतीचे चार ग्रॅमचे सोन्याचे बदाम, 20 हजार रुपये किमतीची, पाच ग्रॅमची अंगठी, 25 हजार रुपये किमतीच्या, तीनशे ग्रॅमच्या अन्नपूर्णा, गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती आणि रोख रक्कम, असा ऐवज चोरून नेला. लोटके पुन्हा कोडोलीतील घरी गेले असता, चोरी झाल्याचे लक्षात आले. पोलीस उपनिरीक्षक एस. के. शिरोळ तपास करत आहेत.