नगर – येथील नगर महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलात चोरट्यांनी धुमाकूळ घालत महापालिकेचे स्थानिक संस्था कराचे कार्यालय व एका वृत्तपत्राचे कार्यालय अज्ञात चोरट्यांनी फोडले. या दोन्ही कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात उचकापाचक करण्यात आली असून, संगणक व इतर साहित्याची चोरी झाल्याचे सांगण्यात आले आहे.
जुन्या महानगरपालिकेजवळ महापालिकेचे व्यापारी संकुल आहे. यात मनपाचे मार्केट विभाग, एलबीटी विभाग, दोन वृत्तपत्रांची कार्यालये तसेच पोस्ट कार्यालय आहे. शुक्रवारी (दि.31) रात्री अज्ञात चोरट्यांनी या संकुलातील मनपाच्या एलबीटी कार्यालय व वृत्तपत्राच्या कार्यालयाचे कुलूप तोडून आतील सामानाची उचकापाचक केली. मनपाच्या कार्यालयातून संगणक संच व इतर साहित्याची चोरी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर वृत्तपत्राच्या कार्यालयातही उचकापाचक करण्यात आली आहे. या कार्यालयातूनही संगणक संच चोरीला गेल्याचे सांगितले जात आहे. चोरट्यांनी संकुलाच्या आवारातील सर्व लाईटच्या ट्यूब फोडल्या आहेत. या संकुलात वॉचमन नसल्यामुळे इमारतीच्या सुरक्षेबाबत मनपाकडून दुर्लक्ष होत असल्याचे तेथील गाळेधारकांकडून सांगण्यात आले. कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीसघटनास्थळी दाखल झाले.