टाकळीभान – टाकळीभान (ता.श्रीरामपूर) येथील ग्रामपंचायत मालकीचे माञ भाडेतत्वावर चालविण्यास दिलेले सप्तपदी मंगल कार्यालयाच्या गोदामाच्या मुख्य लोखंडी दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी राञीच्या वेळी तोडून साउंड सिस्टीमचा किंमती ऐवज चोरुन नेला आहे. गेल्या आठ दिवसापासून ठेकेदार भाडेकरु इकडे फिरकला नसल्याने चोरी नेमकी कधी झाली याबाबत साशंकता आहे.
टाकळीभान येथील ग्रामपंचायतीच्या मालकीचे सप्तपदी मंगल कार्यालय बेलपिंपळगाव येथील रामेश्वर शिंदे यांनी एक वर्षाच्या कराराने भाडेतत्वावर चलवण्यास घेतले आहे. शिंदे यांचा मंडप आणि साउंड सिस्टीमचा व्यवसाय असल्याने या मंगल कार्यालयातील व्यायाम शाळेला गोदाम करुन सर्व साहित्य या गोदामात ठेवले जाते. गेल्या आठ दिवसापुर्वी सर्व साहित्य या गोदामात जमा करुन शिंदे इकडे फिरकलेच नाही.
देवगड संस्थानवर मंडप व साउंडचे काम सुरु झाल्याने आज गुरुवारी सकाळी साहित्य घेण्यासाठी आले असता मुख्य दरवाजाच्या लोखंडी गेटचे कुलूप तोडल्याचे त्यांना दिसून आले. गोदामात जावून पाहिले असता खिडकिचे गजही कापून साउंड सिस्टीमचे माईक, केबल, युनिट, मिक्सर, इम्पलिफायर हे सर्व साहित्य गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हे सर्व साहीत्य महागडे आसल्याने त्याची किंमत सुमारे साठ ते सत्तर हजार रुपये असल्याचे शिंदे यांनी सांगितले. याबाबत टाकळीभान दुरक्षेत्राला खबर देण्यात आली. पोलीस सहायक बाबा सय्यद यांनी घटनास्थळाला भेट देवुन पाहणी केली. उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याचे काम सुरु होते.