कलाकारांचे हाल : कोविडमुळे रसिकांचा प्रतिसाद घटल्याचा परिणाम
पिंपरी – कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास नऊ महिने नाट्यगृहांना टाळे होते. गतवर्षी डिसेंबरपासून पिंपरी-चिंचवडमधील नाट्यप्रयोगांना सुरूवात झाली. गेले तीन महिने नाट्यप्रयोग व्यवस्थित सुरू होते. मात्र, आता कोविडचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने रसिकांचा प्रतिसाद घटला आहे. त्यामुळे नाट्यप्रयोग रद्द होऊ लागले आहेत.
गतवर्षी मार्च महिन्यात शहरामध्ये कोविडचे रुग्ण सापडण्यास सुरूवात झाली. देशभरात 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन करण्यात आला. लॉकडाऊनमध्ये नाट्यगृहे बंद पडली. नोव्हेंबर महिन्यात 50 टक्के आसन क्षमतेसह नाट्यप्रयोग करण्यास परवानगी मिळाली. मात्र, “दिवाळी पहाट’च्या कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली.
तसेच, केवळ 50 टक्के आसन क्षमतेसह नाट्यप्रयोग करण्यास परवानगी मिळाल्याने नाट्यगृहांचे भाडे देखील कमी करण्याची मागणी नाट्य निर्मात्यांकडून करण्यात आली. मात्र, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता असल्याने नाट्यगृहांचे भाडे कमी करण्याबाबतचा निर्णय लांबणीवर पडला. पर्यायाने, नोव्हेंबरमध्ये नाट्यगृहांमध्ये ठरलेले प्रयोगही रद्द करण्यात आले. 13 डिसेंबरला पहिला नाट्यप्रयोग झाला. त्यानंतर शहरातील नाट्यगृहांमध्ये नाट्यप्रयोगांना सुरूवात झाली.
डिसेंबर ते फेब्रुवारी अशा तीन महिन्यांमध्ये विविध नाटकांचे प्रयोग झाले. त्याला रसिकांचा प्रतिसादही मिळाला. 50 टक्के आसन क्षमतेसह होणाऱ्या या प्रयोगांसाठी करोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षता घेण्यात येत होती. मात्र, सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने नाटकांचे प्रयोग रद्द होऊ लागले आहेत. नाटकांना रसिक मिळतील की नाही, या भीतीने हे प्रयोग नाट्य निर्मात्यांकडून रद्द केले जात आहेत. संपूर्ण वर्षभर हलाख्यात दिवस काढलेल्या कलाकारांना व या क्षेत्रातील इतरांना नाट्यप्रयोग सुरु झाल्याने काहीसा दिलासा मिळाला होता. परंतु आता प्रयोगच रद्द होऊ लागल्याने त्यांचे पुन्हा हाल सुरु झाले आहेत.
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रविवारी (दि. 28) आयोजित दोन नाटकांचे प्रयोग रद्द झाले आहेत. पुढचा नाट्यप्रयोग आता 15 दिवसांनीच आहे. डिसेंबरपासून नाट्यप्रयोगांना सुरूवात झाल्यानंतर आठवड्याला दोन ते तीन नाटक होत होते. नाटकांना रसिक मिळतील की नाही, या भीतीने सध्या नाट्यप्रयोग रद्द होऊ लागले आहेत.
– एम.व्ही.भुतकर, व्यवस्थापक, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आमचे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील काही नाट्यप्रयोग रद्द झाले. गेल्या तीन महिन्यांमध्ये नाटकांचे प्रयोग पुर्ववत सुरू झाले होते. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पुन्हा चिंता वाढली आहे. नाटकांना प्रेक्षक मिळतील की नाही, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.
– डॉ. संजीवकुमार पाटील, नाट्य अभिनेते.