पिंपरी – मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास झोपेतून उठविलेल्या तरुणाने सिगारेट दिली नाही. या कारणावरून चार जणांनी एका तरुणाला दगडाने मारहाण केली. ही घटना चिंचवडच्या दळवीनगर झोपडपट्टी येथे बुधवारी (दि. 17) घडली.
मधुकर मोतीराम शिरसाठ (वय 36, रा. दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी बुधवारी (दि. 17) याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विशाल ऊर्फ लंगड्या, बबलू शर्मा, सोनू शर्मा, भाव्या कांबळे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी शिरसाठ हे आपल्या घरी झोपले होते. बुधवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास आरोपींनी शिरसाठ यांच्या घराचा दरवाजा वाजविला. फिर्यादी हे दरवाजा उघडून बाहेर आले असता त्यांच्या तोंडओळखीच्या आरोपींनी त्यांच्याकडे सिगारेट मागितली. मात्र शिरसाठ यांनी सिगोरट दिली नाही, या कारणावरून संतापलेल्या आरोपींनी त्यांना दगडाने डोक्यात व पायावर मारहाण केली.