नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचे दरदिवशी नवे आकडे समोर येताना दिसत आहेत. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण जगभरात कोरोनामुळे 85 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनाने जवळपास चार लाख 55 हजार लोकांचे बळी घेतले आहेत.
आतापर्यंत 44 लाख लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरात जवळपास 62 टक्के कोरोनाचे रुग्ण फक्त 8 देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 51 लाखांहून अधिक झाली आहे.
कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव अमेरिकेत पाहायला मिळत आहे. अमेरिकेमध्ये 22 लाखांहून अधिक लोक आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकले आहेत. तर एक लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु, आता दरदिवशी ब्राझीलमध्ये अमेरिकेपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. ब्राझीलनंतर रशिया आणि भारतात कोरोना बाधितांची संख्या जगभरात सर्वाधिक आहे.