जेसलमेर – एका पंक्चरच्या दुकानात चर्चा करत असलेले पाच तरुण बघता-बघता खचलेल्या जमिनीत सामावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुदैवाने नाला कोरडा होता. यातील पाचही जणांना किरकोळ दुखापत झाली. या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे.
व्हिडीओमध्ये तरुण बोलत असताना अचानक नाल्यात पडताना दिसत आहे. ही घटना जेसलमेरची आहे. रेल्वे स्थानकाच्या पुढे बाबा बावडी येथील मुख्य रस्त्यावर श्रावण चौधरी यांचे टायर पंक्चरचे दुकान आहे. दुकानाच्या बाहेरून जुना पावसाळी नाला जातो. नाला दगडी स्लॅबने झाकलेला होता. सध्या नाला कोरडा पडला असून दुकानदाराकडे दोन तरुण काम करत होते.
याचदरम्यान बोलेरोवर स्वार असलेले दोन युवक पंक्चर दुरुस्त करण्यासाठी आले होते. यावेळी एक तरुण बसला आणि पंक्चर काढू लागला. बाकीचे चार जण गप्पा मारत होते. त्याचवेळी अचानक नाल्यावरील पट्टी तुटली. काही वेळातच दुचाकीसह पाचही तरुण नाल्यात पडले. सुदैवाने नाला कोरडा होता. त्यामुळे सर्वांना किरकोळ जखमा झाल्या.