हनुमान महाराजांच्या उत्सवाची सांगता : तरुणींचाही उत्स्फूर्त सहभाग
महाळुंगे इंगळे – शेलपिंपळगाव येथील श्री हनुमान महाराजांच्या उत्सवाची विविध धार्मिक कार्यक्रमांनी सांगता झाली असून, या उत्सवा निमित्त आयोजित करण्यात आलेला कुस्त्यांचा आखाडा तरुणींनी गाजवला.
प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही शेलपिंपळगाव येथे श्री हनुमान महाराजांच्या उत्सवानिमित्त विविध अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गेले दोन दिवस येथे छबिना, भजन, सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल सुरु होती.
करमणुकीसाठी वसंतराव नांदवळकरसह रवींद्र पिंपळे यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. दुसऱ्या दिवशी शेलपिंपळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या कुस्त्यांच्या आखाड्याचे उद्घाटन खेडचे आमदार दिलीप मोहिते, सरपंच विद्या मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वस्ताद किसन लांडगे, किसन शिंदे, उत्सव समितीचे अध्यक्ष काळूराम दौंडकर, गोविंद दौंडकर, बापूसाहेब थिटे, संतोष गायकवाड, सयाजीराजे मोहिते, सुभाष वाडेकर, संजय मोहिते आदि उपस्थित होते.
या आखाड्यात तरुणींसह एकूण 400 नामांकित मल्लांनी कुस्त्यांचा आखाडा गाजवला. विजेत्या पहिलवानांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. रात्री करमणुकीसाठी मदमस्त अप्सरा हा लावण्यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. समस्थ ग्रामस्थ शेलपिंपळगाव व उत्सव समिती शेलपिंपळगाव यांच्या वतीने वरील सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.