Gautami Deshpande : अभिनेत्री गौतमी देशपांडेचा (Gautami Deshpande) बॉयफ्रेंड स्वानंद तेंडूलकरसोबत मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा संपन्न झाला. अनेक मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी या लग्नाला हजेरी लावली होती. अनेकांनी या नवं दाम्पत्यासोबतचे फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. गौतमी आणि स्वानंद यांच्या मेहंदी, हळदी आणि लग्नाचे फोटो तुफान व्हायरल झाले. यानंतर आता गौतमीची बहीण अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) तिच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
मृण्मयीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, “अजूनही विश्वास बसत नाही की गौतमीचं लग्न झालं… प्रत्येक गोष्टीमध्ये ताई हवी असणारी माझी बहीण स्वतःच्या संसाराला लागली… या क्षणी नक्की काय वाटतंय ते शब्दात सांगता येत नाही. आनंद, काळजी..आता ती officially दुसऱ्याची झाली याचं दुःख.. आणि तिच्या मनासारखा जोडीदार मिळाल्याचा आनंद. सगळ्याच भावना एकत्र आल्या आहेत… काल परवा पर्यंत ताईचे शेपूट असणार आमचं बाळ ‘संसार’ करताना बघणं मजेचं असणार आहे. यापुढे आम्हा बहिणींची gossips एकतर्फी नसतील आणि कदाचित तिचा संसार सुरू झाल्यावर ,”ताई तुला माझ्यासाठी वेळच नसतो..” ही तिची तक्रार संपेल… कारण..? तिचं तिलाच कळेल!”
View this post on Instagram
मृण्मयी पुढे लिहिते की, “स्वानंद तुझं वेगळं स्वागत करण्याची गरज नाही… लग्नाआधीच तू फॅमिली मेंबर झाला होताच… गौतमी स्वानंदची काळजी घे… स्वानंद गौतमची साथ सोडू नकोस… संसार कोणाचाच सोपा नसतो.. पण एक दुसऱ्याचा हात घट्ट पकडलेला असला की कुठल्याही अडचणी वरती मात करता येते.. कदाचित सहज नाही… पण मात करता येते!! एकमेकांवर विश्वास असू द्या… संवाद असू द्या… नातं किंवा प्रेम असंच टिकत नाही त्यासाठी दोघांनीही कष्ट घेण्याची गरज असते… एकमेकांच्या प्रेमात पडण्याची नवीन कारणं शोधत रहा… एकमेकांना सांभाळून घ्या… आता फक्त तुम्ही दोघं नाही आहात दोन्ही कुटुंब एकत्र आली आहेत.. सगळ्यांची काळजी घ्या… आणि मी एवढं प्रेमाने बोलून सुद्धा, एवढं छान लिहून सुद्धा वेड्यासारखे वागलात, तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा!!!! लै हनीन.”
दरम्यान, गौतमी देशपांडे ‘माझा होशील ना’ या मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. या मालिकेतील तिच्या भूमिकेचे देखील खूप कौतुक झाले होते. तर गौतमी देशपांडेचा पती स्वानंद तेंडुलकर एक कंटेंट क्रिएटर असून सोशल मीडियावर त्याचे अनेक रील्स व्हायरल होतात.