वॉशिंग्टन – आधीच बिकट आर्थिक स्थिती असताना आता करोनामुळे साऱ्या जगाची अर्थव्यवस्था पुर्ण धोक्यात आली असून जगाने आता मंदीत प्रवेश केला आहे असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. तथापी यातून सारे जग पुढील वर्षापर्यंत बाहेर येईल असेही नाणेनिधीने म्हटले आहे. नाणेनिधीचे व्यवस्थापकीय संचालक क्रिस्तलिना जॉर्जियेव्हा यांनी आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की आम्ही सन 2020 आणि सन 2021 च्या विकासाच्या शक्यतेचा सारा अभ्यास केला.
त्या अभ्यासानंतर आपण आता मंदीत प्रवेश केला आहे हे दिसून आले आहे. सन 2009 च्या मंदीपेक्षाही ही मंदी भीषण आहे असेही त्यांनी म्हटले आहे. तथापि सन 2021 च्या वर्षात या स्थितीत सुधारणा होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. जागतिक आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी नाणेनिधीच्या गव्हर्निंग बॉडीची बैठक झाली. त्यानंतर जॉर्जियेव्हा यांनी पत्रकारांना ही माहिती सांगितली. सन 2021 ला स्थिती सुधारेल असा आमचा विश्वास असला तरी ते, जग करोना विषाणुंचा प्रसार कितीप्रभावीपणे रोखते आणि रोकड उपलब्धता किती सुलभपणे होणार यावर हे अवलंबून आहे.
त्याचा अंदाज घेऊन आम्ही पुढील आठवड्यात याचा नेमका अंदाज वर्तवू शकू असे त्यांनी सांगितले. सध्याच्या संकटाच्या वातावरणात आमच्याकडे संपुर्ण जगातून 81 देशांनी आणिबाणीच्या स्थितीची आर्थिक मदत मागितली आहे. अशी मागणी करणाऱ्या देशांपैकी 50 देश हे कमी उत्पन्न गटातील आहेत. त्यांच्याकडे त्यांची स्थिती सुधारण्यासाठीचे पुरेसे पैसे नाहीत याची आम्हालाही कल्पना आहे असे त्यांनी नमूद केले.