कर्वेनगरमधील घटना; कर्मचाऱ्याने अहवालाचे केले सामूहिक वाचन
कर्वेनगर – करोना रिपोर्ट अहवालाचे सामूहिक वाचनाचे प्रकार घडत आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना तुम्हाला कारोना झालाय, असे महापालिका कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे. या चुकीच्या पद्धतीमुळे रुग्णांमध्ये करोनाविषयी अधिकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्वेनगरमधील गोसावी वस्तीमध्ये करोनाबाधित रुग्ण सापडत असल्याने येथील काही कुटुंबांना मराठवाडा कॉलेजमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट आल्यानंतर त्याबाबत माहिती देताना तेथील कर्मचाऱ्याने एका महिलेला तुम्हाला करोना झालाय…, असे सांगितल्यानंतर संबधित महिला जागेवरच कोसळली. या प्रकारामुळे त्या कुटुंबातील सदस्यांमध्ये अधिकच भीती निर्माण झाली आहे.
करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असला तरी संबंधित व्यक्तीला सांगताना त्यांना धक्का बसणार नाही तसेच तुम्ही बरे व्हाल, औषधोपचार चांगल्या पद्धतीने दिले जात आहेत, अशा पद्धतीने सांगणे गरजेचे आहे. याबरोबरच करोनासह उपचाराकरिता रुग्णालयात दाखल होण्याची प्रक्रियाही समजावून सांगणे गरजेचे आहे. परंतु, अहवाल वाचन केल्याप्रमाणे पालिका कर्मचारी क्वारंटाइन सेंटरमध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असे वाचन करीत असल्याने रुग्णांत भीती निर्माण होत आहे.
विशेषकरून लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ व्यक्तीशी योग्य पद्धतीने संवाद साधून त्यांना विश्वासात घेत अहवालाची माहिती देणे महत्त्वाचे ठरत आहे. जर, सामूहिक वाचन पद्धतीने अहवाल वाचन होत असेल तर यातून संबंधित रुग्णास मानसिक धक्का बसण्याची अधिक शक्यता आहे. रिपोर्टबाबत रुग्णांशी संवाद साधताना खबरदारी घ्यावी, अशा सूचना पालिका प्रशासनाने द्याव्यात, असे किशोर कांबळे यांनी सांगितले.