Asian Relay Championships 2024 : भारतीय मिश्र रिले संघाने आशियाई रिले चॅम्पियनशिपमध्ये राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. असे असूनही, मोहम्मद अजमल, ज्योतिका श्री दांडी, अमोज जेकब आणि शुभा व्यंकटेशन या चौकडीला पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळू शकले नाही. भारताचा विक्रमी प्रयत्न असूनही ते ऑलिंपिक पात्रतेसाठी आवश्यक वेळेपासून ते दूर राहिले.
भारतीय संघाने 3 मिनिट 14.12 सेकंद वेळ नोंदवत सोनेरी यश संपादन केले आणि हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत सेट केलेल्या 3.14.34 चा विक्रम मागे सोडला. त्यावेळी भारतीय संघाने रौप्यपदक जिंकले होते. श्रीलंकेने या स्पर्धेत 3 मिनिट 17 सेकंदाच्या वेळेसह रौप्य आणि व्हिएतनामने 3:18.45 सेकंदाच्या वेळेसह कांस्यपदक जिंकले.
पॅरिससाठी टॉप 16 मध्ये पोहोचणे आवश्यक…
या कामगिरीसह भारतीय संघ क्रमवारीत 23व्या वरून 21व्या स्थानावर पोहोचला आहे. मात्र, पॅरिसच्या तिकिटासाठी भारताला अव्वल 16 मध्ये स्थान मिळवणे गरजेचे आहे. नासाऊ (बहामास) येथे झालेल्या जागतिक रिले ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 14 संघांनी पॅरिसची तिकिटे मिळविली आहेत. क्रमवारीच्या आधारे 15वे आणि 16वे स्थान दिले जाईल. सध्या, झेक प्रजासत्ताक (3.11.98) आणि इटली (3.13.56) 15 व्या आणि 16 व्या स्थानावर आहेत. या स्पर्धेत भारताला इटलीच्या वेळेला पिछाडीवर टाकायचे होते. मात्र, भारतीय संघ अपयशी ठरला.
World Athletics Relays 2024 : भारताचे रिलेचे दोन्ही संघ ऑलिम्पिकसाठी पात्र….
जागतिक रिले स्पर्धेतही ठरला होता अपयशी…
भारताच्या पुरुष आणि महिलांच्या 400 मीटर रिले संघाने जागतिक रिले ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ऑलिम्पिक तिकिट मिळविले आहे, परंतु मिश्र रिले संघाने येथे चांगली कामगिरी केली नव्हती. या स्पर्धेत राजेश रमेशला दुखापत झाल्यामुळे मिश्र रिले संघाने दुसऱ्या फेरीत भाग घेतला नव्हता. दरम्यान, ऑलिम्पिक पात्रतेची अंतिम तारीख 30 जून आहे. ॲथलेटिक महासंघ आता इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मिश्र रिले संघाला मैदानात उतरवून पॅरिसचे तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करेल.