अहमदनगर : महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग मंडळाची पहिली एसटी बस अहमदनगर ते पुणे या मार्गावर धावली होती. या पहिल्या एसटी बसचे वाहक अर्थात कंडक्टर लक्ष्मण केवटे यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते 99 वर्षांचे होते. बुधवारी रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे पहिले एसटी वाहक लक्ष्मण शंकर केवटे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःख देणारी आहे. 1948 साली महाराष्ट्रात सुरु झालेल्या एसटीचे पहिले वाहक म्हणून सेवा बजावणारे लक्ष्मण केवटे यांनी एसटी महामंडळाच्या सेवेत मोलाचे कार्य केले आहे. त्यांची अलौकिक सेवा सर्व एसटी कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.”
पुढे मुख्यमंत्री म्हणाले, “महाराष्ट्रात प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाची असणाऱ्या एसटी सेवेने असंख्य प्रवाशांना आपलेसे केले. या एसटीच्या प्रवासाची सुरुवात करणाऱ्या लक्ष्मण केवटेंचा जीवनप्रवास जरी थांबला असला तरी एसटीच्या इतिहासात त्यांच्या कार्याची दखल कायमस्वरूपी घेतली जाईल.”
80 रुपये होता पगार
अहमदनगरच्या माळीवाडा भागातून पुण्यापर्यंत ही पहिली बस 1 जून 1948 रोजी धावली होती. त्या बसचे पहिले चालक किसन राऊत आणि पहिले वाहक लक्ष्मण केवटे होते. हे दोघेही अहमदनगर जिल्ह्यातीलच होते. केवटे ज्यावेळी महामंडळात भरती झाले तेव्हा त्यांना 80 रुपये पगार मिळत होता. नगर ते पुणे या अंतरासाठी पहिल्या बसचे भाडे अडीच रुपये होते.
विशेष म्हणजे महाराष्ट्राची पहिली इलेक्ट्रिक बसही नगर ते पुणे या मार्गावर 1 जून 2022 रोजी सुरू केली होती. त्यावेळी केवटे देखील उपस्थित होते. महाराष्ट्राची पहिली बस ते इलेक्ट्रिक बस या दोन्ही घटनांचे ते साक्षीदार होते.