नवी दिल्ली: भारतीय पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची इस्रायली स्पायवेअर पेगाससचा वापर अज्ञात संस्थांकडून जागतिक पातळीवर हेरगिरी होत आहे, असे व्हॉटस अॅपने म्हटले आहे. हेरगिरी करणारी इस्त्रायली कंपनी “एनएसओ ग्रुप’वर दावा दाखल करत असल्याचे व्हॉट्स अॅप म्हटले आहे.
चार खंडांमध्ये पसरलेल्या अंदाजे 1,400 वापरकर्त्यांचे फोन हॅक करण्यास मदत करणाऱ्या तंत्रज्ञानाच्या मागे “एनएसओ ग्रुप’चा हात आहे, असा व्हॉटस अॅपचा दावा आहे. हॅक झालेल्या व्यक्तींमध्ये मुत्सद्दी, राजकीय असंतुष्ट गटांचे नेते, पत्रकार आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी यांचा समावेश आहे, असे व्हॉटस अॅपने म्हटले आहे.
जगभरातील पत्रकार आणि कार्यकर्त्यांचे फोन कोणाच्या सांगण्यावरून हॅक झाले, व्हॉटस अॅपला सांगता आले नाही. भारतातील किती जणांचे आणि कोणाकोणाचे फोन हॅक झाले, हे देखील सांगण्यास व्हॉट्स अॅपने नकार दिला आहे.
व्हॉट्सअॅपने म्हटले आहे की मे महिन्यात एक अत्यंत अत्याधुनिक सायबर हल्ला थांबविला होता. वापरकर्त्यांकडे मालवेयर पाठविण्यासाठी व्हिडिओ कॉलिंग सिस्टमचा गैरवापर केला. ज्या व्यक्तींना या सायबर हल्ल्याचे लक्ष्य केले गेले असणे शक्य होते, अशा 1,400 जणांना एक विशेष मेसेज पाठवण्यात आल्याचेही व्हॉटस अॅपने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, भारतीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्स अॅपकडून सोमवारपर्यंत सविस्तर प्रतिसाद मागितला आहे. या आरोपांबाबत आणि भारतात किती वापरकर्त्यांना हॅक केले गेले आहे याचा सविस्तर प्रतिसाद देण्यास व्हॉट्स अॅपला सांगितले आहे, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले.