पाण्यासाठी पश्‍चिम भागाची परवड

मेणवली – मे महिना संपण्यापूर्वीच धोम धरणात पाण्याचा ठणठणाट झाल्याने पाणीपुरवठा योजनांचे फुटबॉल उघडे पडून वाईच्या पश्‍चिम भागाची पिण्याच्या पाण्यासाठी परवड सुरू झाली आहे. “धरण उशाला अन्‌ कोरड घशाला’ अशी परिस्थिती पश्‍चिम भागातील जनतेची झाली आहे.

प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे दरवर्षी एप्रिल व मे महिन्याअगोदरच धरणातील पाणी तळ गाठत असल्याने जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. वाईच्या पश्‍चिम भागात 13 टीमसीचे धोम व चार टीमसीचे बलकवडी अशी दोन धरणे आहेत. मात्र धोम धरण पाटबंधारे व प्रशासनाच्या बेजबाबदार नियोजनामुळे एप्रिल व मे महिन्याच्या अगोदरच धोम धरणातील पाणी पातळी प्रमाणापेक्षा जास्त घटली जाऊन पश्‍चिम भागातील जनतेवर पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहत आहे.

पावसाळ्यानंतर दोन्ही धरणातून शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे कसलेही परिपत्रक अगर सूचना जनहितासाठी जाहीर केली जात नसल्याने स्थानिक जनतेची व अन्य लाभ धारकांची दिशाभूल होत असल्याचा आरोप येथील जनतेतून केला जात आहे. पावसाळ्यात धोम धरण पूर्ण क्षमतेने भरल्या शिवाय बलकवडी धरणाचे वक्र दरवाजे बंद करण्याचा लेखी कराराला अलिखित करून पहिल्यांदा बलकवडी धरण भरले जात आहे तर धोम धरणातून बोगद्यावाटे खंडाळ्याला सोडलेले पाणी बलकवडीचे का धोमचे, याचेही गणित आजपर्यंत कोणालाच कळले नाही व कळूही दिले जात नसल्याने एप्रिल व मे महिन्यात पिण्याच्या पाण्याचे संकट पश्‍चिम भागातील धरणालगतच्या गावांवर ओढवले जात आहेत.

याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न विचारला जात आहे. धरण परिसरात मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही पाटबंधारे व प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे व ठराविक राजकीय दबावापोटी धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात गरजेपेक्षा जास्त विसर्ग केला जात असल्यामुळेच जून अखेर शिल्लक राहणारा पाणीसाठा एप्रिल मे महिन्यात संपत असल्याने धरणातील पाणीपातळी खाली जाऊन पश्‍चिम भागात पाणीटंचाई निर्माण होत आहे, असे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. धरणातील पाणी जसजसे खाली जात आहे तसतसे मोटरचे फुटबॉल उघडे पडत असल्याने धरणा लगतच्या गावांची तहान भागवण्यासाठी रोज फुटबॉल पाण्यात ठेवण्यासाठी ग्रामस्थांची धावपळ होत आहे, ती थंबवण्याची खबरदारी पाटबंधारे विभागाने गंभीरतेने घ्यावी, अशी मागणी जोर धरत जात आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×