बॉलिवूडचा “किंग’ शाहरुख खानचे निवासस्थान “मन्नत’ पाहण्यासाठी देशभरातून चाहते गर्दी करतात. दोनशे कोटींच्या घरात किंमत असलेले शाहरुखचे हे आलिशान घर कदाचित बॉलिवूडच्या दुसऱ्या सुपरस्टारच्या मालकीचे असते. अभिनेता सलमान खानचा “‘मन्नत’वर डोळा होता. मात्र, वडिलांनी हटकल्यामुळे सलमानने बंगल्याच्या खरेदीचा नाद सोडला होता.
सलमान आणि शाहरुख खान यांच्या यारी-दोस्तीचे किस्से बॉलिवूडसाठी नवीन नाहीत. मुंबईत वांद्रयाच्या समुद्रकिनारी असलेल्या बंगल्यावर शाहरुखच्या आधी सलमानची नजर पडली होती. सलमानने वडील अर्थात प्रख्यात लेखक सलीम खान यांचे मत विचारात घेतले. मात्र सलीम खान यांनी मुलाचे म्हणणे धुडकावून लावले.
“इतक्या मोठ्या घरात काय करणार?’ असा प्रश्न वडिलांनी विचारल्यामुळे मी विषय सोडून दिला, असे सलमानने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. आता मला हाच प्रश्न शाहरुखला विचारायचा आहे, की तू इतक्या मोठ्या घरात करतोस काय?’ असे सलमान गंमतीत म्हणतो. सलमान वांद्रयातच गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो.
शाहरुखने एका रेडिओ शोला दिलेल्या मुलाखतीत बंगला खरेदी मागच्या भावना सांगितल्या होत्या. मी दिल्लीहून आलो आहे. दिल्लीत कोठी म्हणजेच बंगल्याची पद्धत आहे. मुंबईत मात्र फ्लॅट किंवा अपार्टमेंट सिस्टम. दिल्लीत एखादी मध्यमवर्गीय व्यक्तीही छोट्या बंगल्यात राहते, असे शाहरुखने सांगितले होते.