ओतूर – सांसद आदर्श ग्राम कोपरे-मांडवे (ता. जुन्नर) येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून
जिल्हा नियोजन समितीने नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत 36.70 लाख रकमेच्या 2 झिंक अल्युम स्टील प्री फॅब्रिकेटेड मेटॅलिक टॅंकच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
कोपरे, मांडवे, जांभुळशी, मुथाळणे ही जुन्नर तालुक्यातील दुर्गम आदिवासी क्षेत्रातील गावे वर्षांनुवर्षे पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. त्यामुळे कोपरे गाव दत्तक घेतल्यानंतर इथला पाणीप्रश्न सोडवण्याची मागणी सातत्याने केली जात होती.
त्यामुळेच जिल्हा नियोजन समितीच्या यंदाच्या वार्षिक आराखड्यातून पहिल्या टप्प्यात काठेवाडी (कोपरे) येथील झिंक अल्युम स्टील प्री फॅब्रिकेटेड मेटॅलिक टॅंकसाठी 17.99 लाख तर शेलाचा माळ (मांडवे) येथील टॅंकसाठी 18.71 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.
तसेच यापूर्वी कोपरे 20 लाख आणि जांभुळशी 20.30 लाख येथे सिमेंट बंधाऱ्यांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या 2020-21 या आर्थिक वर्षात एकूण 40.30 लाख इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे कोपरे परिसरातील पाणीप्रश्न सुटण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.