वाल्हे -येतील मुकदमावाडीत करोनाबाधित रुग्ण आढळल्याने गावात मंगळवार (दि. 7)चा भरलेला आठवडेबाजार दुपारनंतर बंद करण्यात आला. तर बुधवारी (दि. 8) संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच गुरुवार (दि. 9) पासून सकाळी आठ ते दुपारी 1 वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असून दुपारी 1 नंतर अत्यावश्यक सेवा वगळता बाकीची सर्व दुकाने बंद राहणार असल्याची माहिती सरपंच अमोल खवले यांनी दिली.
वाल्ह्यात मंगळवारचा आठवडे बाजार भरला असताना, मुकदमवाडी येथील एकास करोनाची लागण झाल्याचे समजताच खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल खवले, पोलीस ठाण्यात कर्मचारी बी. व्ही.जगदाळे, समीर हिरगुडे आदींनी वाल्हे येथील आठवडे बाजार बंद करण्याची विनंती बाजारामधील शेतकरी व व्यापारीवर्गाला केली. त्यानुसार शेतकरी व व्यापाऱ्यांनी त्यास प्रतिसाद देत बाजर बंद केला.