मुंबई – ‘पानिपत’, ‘महानायक’, ‘झाडाझडती’ यांसारख्या कितीतरी दर्जेदार कादंबऱ्यांचे लेखक ‘विश्वास पाटील’ यांच्या ‘चंद्रमुखी’ या हटके कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चंद्रमुखी चित्रपटाची निर्मिती अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा एक टिझर प्रदर्शित करण्यात आला होता. टीझरमध्ये पिळदार शरीरयष्टी असणारा पाठमोरा ‘तो’ ध्येयधुरंदर राजकारणी दिसत आहे. हा चेहरा कोण? असेल याविषयी अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. त्यानंतर या प्रश्नाला पूर्णविराम देत ही व्यक्तिरेखा अभिनेता “आदिनाथ कोठारे’ साकारणार असल्याचे स्पष्ठ झाले. तसेच चित्रपटात चंद्रमुखीची मुख्यभूमिका अभिनेत्री ‘अमृता खानविलकर’ साकारणार आहे.
दरम्यान, आज बहुचर्चित अश्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. आपल्या मोहमयी रूपाने, घायाळ अदांनी, आणि बहारदार नृत्याने सर्वांनाच प्रेमात पाडणारी सौंदर्यवती ‘चंद्रा’ हिने खासदार दौलतराव देशमानेसोबतच प्रेक्षकांनाही वेड लावले. आणि आता हीच निर्मळ प्रेमकथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सिनेरसिकांनी चंद्रमुखीला अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे.