निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचा पुढाकार
शिक्रापूर – निमगाव म्हाळुंगी येथील सरपंच बापूसाहेब काळे जेजुरी येथून येत असताना रस्त्यामध्ये एक जखमी हरीण दिसले. त्यांनी या हरणाला गाडीमध्ये घेत तळेगाव ढमढेरे पशु वैद्यकीय रुग्णालय येथे आणत निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकार्यांकडे सुपूर्त केल्याने सरपंचांच्या सतर्कतेने हरणाला जीवदान मिळाले आहे.
सरपंच बापूसाहेब काळे रात्रीच्या सुमारास जेजुरी येथून येत असताना त्यांना उरुळीकांचन जवळ एक जखमी हरीण रस्त्यावर दिसताच त्यांनी तातडीने हरणाला गाडीमध्ये घेत तळेगाव ढमढेरे येथे आणत निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख यांच्याकडे सुपूर्त केले.
दरम्यान शेरखान शेख यांनी शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप व पश्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप खंडागळे यांच्याशी संपर्क साधून हरणावर प्राथमिक उपचार करत पुढील उपचारासाठी बावधन येथील वन्यप्राणी उपचार केंद्रात पाठवून दिले. या हरणाला जीवदान देण्यासाठी डॉ. पंकज वाबळे, डॉ. सुभाष लेव्हरकर, शेरखान शेख, उपाध्यक्ष सुरज वाघमारे, संचालक सिकंदर शेख, सर्पमित्र अभी वाघमारे, अमोल कुसाळकर, अमोल डाडर, शुभम वाघ, साईदास कुसाळ,
निता गजरे, सतीश भवाळ, अतुल थोरवे, विष्णू पायघन, बावधन वन्यप्राणी उपचार केंद्रातील अमित तोडकर, सायली पिलाने, तुहिन सातारकर यांसह आदींनी विशेष परिश्रम घेतले. तर याबाबत बोलताना कोठेही जखमी वन्य पशु पक्षी आढळून आल्यास नागरिकांनी सतर्कता दाखवणे गरजेचे असल्याचे मत उपाध्यक्ष सूरज वाघमारे, सचिव अमर गोडांबे यांनी व्यक्त केले.