चेन्नई -तामीळनाडूत शनिवारी एकाच दिवसातील सर्वांधिक 6 हजार 988 नवे करोनाबाधित आढळले. त्यामुळे त्या राज्यातील बाधित संख्येने 2 लाखांचा टप्पा ओलांडला.
तामीळनाडू बाधित संख्येत देशात महाराष्ट्रापाठोपाठ दुसऱ्या स्थानी आहे.
तामीळनाडूत करोना संसर्गाने आतापर्यंत 3 हजार 400 हून अधिक बाधित दगावले आहेत. ते राज्य करोनाबळींच्या संख्येत देशात महाराष्ट्र आणि दिल्लीनंतर तिसऱ्या स्थानी आहे. तामीळनाडूची राजधानी चेन्नईत 93 हजारांहून अधिक बाधितांची नोंद झाली आहे. त्या राज्यात 1 लाख 51 हजारांहून अधिक बाधित आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत.
देशात करोनाविषयक चाचण्यांचे सर्वांधिक प्रमाण तामीळनाडूत असल्याचा दावा तेथील सरकारकडून केला जात आहे. त्या राज्यात आतापर्यंत सुमारे 23 लाख चाचण्या झाल्या आहेत. तामीळनाडूपाठोपाठ दिल्लीत सुमारे 1 लाख 30 हजार बाधित आहेत.
आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमधील बाधितांची संख्या काही दिवसांत लाखाचा टप्पा गाठण्याची चिन्हे आहेत. उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात आणि तेलंगण या राज्यांमधील बाधितांची संख्या 50 हजारांवर गेली आहे.