हवेली तालुक्यातील अष्टापूर येथील घटना…
वाघोली (प्रतिनिधी) : कच्च्या रस्त्यालगत असणाऱ्या विहिरीत फोर व्हीलर पडून आतमध्ये असणारी ३५ वर्षीय महिला व त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अष्टापुर (ता.हवेली) येथे मंगळवारी (दि.९) रात्री साडे दहाच्या सुमारास घडली. या अपघातात महिलेचे पती बचावले आहेत. तिघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले असून त्यांच्यावर बुधवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शितल सचिन कोतवाल (वय, ३५) यांच्यासह मुलगी सृष्टी कोतवाल (वय, ९) व शौर्य कोतवाल (वय, ६) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर सचिन श्रीहरी कोतवाल (वय ४०) बचावले आहेत.
याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, सचिन कोतवाल हे त्यांची पत्नी व दोन मुलांसह राहू (ता.दौंड) येथे सासुरवाडीला कामानिमित्त गेले होते. तेथून परतत असताना अष्टापूर येथील रामकृष्ण मंगल कार्यालयाजवळ एका शॉर्टकट रस्त्यावरील फळी वस्ती येथे सचिन कोतवाल यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले व त्यांची फोर व्हिलर विहिरीत कोसळली.
सचिन कोतवाल प्रसंगावधान साधत गाडीतून बाहेर आले आणि त्यांनी गाडीतून पत्नी व दोन मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र गाडीच्या काचा बंद असल्याने तो प्रयत्न अयशस्वी ठरला. एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने अष्टापूरसह पूर्व हवेली परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.
विहिरीला संरक्षक कठडे नसल्याने फोर व्हिलर विहिरीत पडून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने हवेली महसूल विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे. हवेलीत सर्व विहिरींचे सर्व्हेक्षण करून संबंधित विहीर मालकांना संरक्षक कठडे उभारण्याबाबत सूचना देण्यात येणार आहे.