नारायणगाव(प्रतिनिधी) – पुणे-नाशिक महामार्गावर एसबीआयचे एटीएम फोडून चोरी करणाऱ्या दोन जणांना होमगार्डच्या सतर्कतेमुळे रंगेहाथ पकडले. होमगार्डवर चोरट्यांनी लोखंडी गजांनी हल्ला करून जखमी केले असल्याची माहिती नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक डी. के. गुंड यांनी दिली.
आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर केले असता 6 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
राहुल वसंत सुपेकर (रा. निघोज, पठारवाडी, ता. पारनेर; सध्या रा. रांजणगाव एमआयडीसी) व बाजीराव बाळासाहेब नागरगोजे (रा. चिंचपूर, ता. पाथर्डी; सध्या रा. रांजणगाव) अशी या चोरट्यांची नावे आहेत. गुरुवारी (दि. 31) पहाटे दोनच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक गुलाबराव हिंगे, पोलीस नाईक दिनेश साबळे, शेख, होमगार्ड अक्षय ठोबळे, राहुल सातपुते, सलमान पठाण, वैभव ताजणे, दिगंबर ढवळे हे ठिकठिकाणी गस्त करताना पुणे – नाशिक महामार्गावरील सर्व एटीएम होमगार्ड ठोबळे व पठाण हे चेक करीत होते. त्यांना एसबीआय बॅंकेच्या एटीएममध्ये दोन व्यक्ती हे शटर अर्धवट लावून आतमध्ये आहेत आणि त्यांच्या हालचाली शंकास्पद वाटल्याने त्यांनी प्रसंगवधान राखून शटर खाली ओढून बंद करण्याचा प्रयत्न केला.
आतील चोरट्याने त्यांच्याकडील लोखडी टॉमी होमगार्ड ठोबळे यांच्या हातावर मारली. या हल्यात ते जखमी झाले तरीही या दोघांनी जीवाची पर्वा न करता एटीएमचे शटर खाली ओढून बंद केले. या घटनेची माहिती पोलीस अधिकारी गुंड यांना दिली. माहिती मिळताच गुंड हे पोलीस नाईक भीमा लोंढे, काळूराम साबळे, शिपाई संतोष दुपारगुडे, सचिन कोबल, नवीन अरगडे, प्रवीण लोहोटे, शामसुंदर जायभाये, शैलेश वाघमारे, गंगाराम कोतकर, होमगार्ड ढवळे, आकाश खंडे, पोलीस मित्र भरत मुठे, ईश्वर पाटे, ऋषिकेश कुंभार व इतर 20 ते 30 जण घटनेच्या ठिकाणी जमा झाले.
आरोपी हे सराईत असून त्यांच्याकडे हत्यार असल्याची शक्यता असल्याने सुरक्षिततेबाबत योग्य ती खबरदारी घेतली. पोलिसांनी दोन्ही आरोपीना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुलाबराव हिंगे व के. डी. ढमाले हे करीत आहेत.