नगर (प्रतिनिधी) – पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याच्या दृष्टीने “रेन हार्वेस्टींग प्रणाली’ राबविण्याची आवश्यकता गोदावरी प्रदुषण निवारण जनहित याचिकेच्या (क्रमांक 176/2012) अनुषंगाने समोर आली आहे. त्यामुळे यापुढे नाशिक विभागातील विभागातील सर्वच शासकीय आणि निमशासकीय कार्यालये तसेच निवासस्थानांच्या आवारात आता “रेन हार्वेस्टींग प्रणाली’ सक्तीची असेल, असे आदेश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत.
पाण्याच्या पनु:र्भरणाद्वारे जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी एका शासकीय परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. गोदावरी प्रदुषण निवारण जनहित याचिकेच्या (क्रमांक 176/2012) अनुषंगाने राज्य सरकारनेच आता ही मोहीम हाती घेतली आहे.
पाण्याच्या पुन:र्भरणाद्वारे पिण्याच्या जलस्त्रोतांचे करण्यासाठी जलसंधारणाचे विविध उपाय अमंलात आणून भूजलाची एकूण पातळी वाढविण्याचा प्रयत्न जलसंधारण विभागाकडून केला जात आहे. त्या अनुषंगाने जलसंधारण विभागाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन पाण्याच्या पुन:र्भरणाद्वारे जलस्त्रोतांचे बळकटीकरणात सर्वांना सहभागी होण्यासाठी प्रेरीत करण्याचे आवाहनही गमे यांनी सर्वच विभागप्रमुखांना केले आहे.
नाशिक विभागात कार्यरत असलेल्या विविध विभागाच्या शासकीय इमारत, निवासस्थाने यांची जुनी बांधकामे आहेत. या शासकीय इमारती, शासकीय निवासस्थाने व त्यांचे आवारात पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याच्या दृष्टीने सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या विभागातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालय, निवासस्थानाच्या आवारात रेन हार्वेस्टींग प्रणालीची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त गमे यांनी दिल्या आहेत.