नगरच्या मार्केट यार्डमधील आडते व्यापारी त्रस्तच 

भाजीपाला, फळफळावळ असोसिएशनतर्फे बाजार समितीमधील व्यवसायासाठी साकडे 

नगर  -करोनाच्या पार्श्‍वभूमीवर मार्केटयार्डमधील ठोक खरेदी व विक्री व्यवयास बंद झाल्याने गेल्या दोन महिन्यांपासून आडते व्यापारी कमालीचे त्रस्त आहेत. दरम्यान, आता लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु झाल्याने सुरक्षिततेचे नियमांसह ठोक खरेदी व विक्री व्यवसायास परवानगी मिळावी, अशी मागणी अहमदनगर भाजीपाला, फळफळावळ आडते व्यापारी असोएिशशनतर्फे आज दिवंगत दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीकडे करण्यात आली.

आडते व्यापाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांच्याकडे देण्यात आले. करोना महामारीचे संक्रमण थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत लॉकडाऊन काळात बाजार समिती आवारात गर्दी होत असल्याने सर्व व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय तातडीने बंद केले होते.

मात्र, लॉकडाऊनचा आता पाचवा टप्पा सुरु झाला आहे. त्यामध्ये अनेक व्यापार व उद्योजकांना सवलती देऊन ते सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे. राज्य शासनाच्या धोरणानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार अत्यावश्‍यक सेवेत येतात. शेतकरी, शेतीपूरक व्यावसायिक व कामगारांचे अर्थिक नुकसान टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती येथील ठोक व्यवसाय व भाजीपाला विभाग पुरवठा सुरळीत सुरु करावा, असा साकडे व्यापाऱ्यांनी घातले.

त्यासाठी फिजिकल डिस्टन्ससह शासनाच्या सर्व नियमांचे पालन मुख्य बाजार समिती येथील आडत व्यावसायिक करणार असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. भाजी, फळविक्रीचा बाजार केडगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भरविण्यात येत आहे. ते शेतकरी व ग्राहकांच्या दृष्टीने गैरसोयीचे आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात अडचन निर्माण होत आहे. शहरातील मुख्य बाजार समिती मध्यवर्ती भागात असून, केडगावला जाऊन विक्री करणे व खरेदी करण्यास वाहतुकीचा खर्च वाढत आहे.

शहरातील मुख्य बाजार समिती हे सोयीचे ठिकाण असल्याने येथेच पुर्वीप्रमाणे भाजी व फळ बाजार भरविण्याची मागणी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. माजी संचालक नंदकिशोर शिकरे, असोसिएशनचे अध्यक्ष अशोकराव लाटे, गणेश लालबागे, अनिलकुमार बजाज, सुनील शेलार, नंदू बोरुडे, मोहन गायकवाड, अशोक निमसे, तानाजी कर्पे, विकास तिवारी, किशोर बोडखे, अनिल ठूबे, पियुष कर्डिले, संभाजी शिंदे, दर्शन विधाते आदींसह व्यापारी यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.