कोकरुड येथील घटना; चालक गंभीर जखमी
शिराळा (प्रतिनिधी) – कोकरुड येथे वारणा नदीच्या पुलाच्या दक्षिणेकडील रस्त्यावर उदय साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर दोन ट्रॉलींसह पुलाच्या दक्षिण बाजूने उतारावरून जाऊन दोनशे फूट उंचीवरून नदीपात्रात कोसळल्याची घटना रविवारी सकाळी दहा वाजता घडली. या अपघातात ट्रॅक्टरचालक बाबू (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) हा गंभीर जखमी झाला असून त्याला कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बांबवडे, ता. शाहूवाडी येथील उदय साखर कारखान्यास ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर दोन ट्रॉलींसह कोकरूड येथे वारणा पुलाच्या दक्षिण बाजूच्या उतारावर रविवारी सकाळी उभा करण्यात आला होता. चालक खरेदी करण्यासाठी दुकानात गेला होता. उतारावर ट्रॅक्टर अचानक सुरू होऊन वेगाने जाऊ लागला.
ट्रॅक्टर थांबविण्यासाठी चालकाने उडी घेऊन ट्रॅक्टरवर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालक ट्रॅक्टरखाली सापडला. त्याच्या पोटावरून ट्रॉलीची चाके गेल्याने तो गंभीर जखमी झाला. ट्रॅक्टर थेट नदीपात्रात कोसळला. हा ट्रॅक्टर बाबू यांनी नुकताच खरेदी केला असून त्याची आरटीओकडे नोंदणीही झाली नसल्याचे सांगण्यात आले. या अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत कोकरुड पोलीस ठाण्यात झाली नव्हती.