नगर – अखिल भारतीय कबड्डी महासंघाने ७० वी वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे यजमानपद नगरला दिले आहे. जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्यावतीने दि.२१ ते २४ मार्च दरम्य़ान स्पर्धेचे आयोजन केले आहे. यात ३२ राज्यातील ४५० खेळाडूंचा सहभाग असणार आहे. हीस्पर्धा वाडिया पार्क येथे होणार आहे.
याबाबत जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्यावतीने सचिव व राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे यांनी पत्रकार परिषद घेतली. दि.२७ ते ३० डिसेंबर २०२२ या कालावधीत आयोजित केलेली ७० वी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गट पुरूष महिला गटराज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा सर्वार्थाने वेगळी ठरली होती. महाराष्ट्रात राज्य अजिंक्यपद स्पर्धा प्रथमच मॅटवर खेळविण्यात आली. या नियोजनबध्द आयोजनामुळे राज्य कबड्डी संघटनेचा उत्कृष्ट आयोजनाचा पुरस्कार जिल्हा संघटनेला मिळाला आहे.दि. ९ जानेवारी रोजी स्पर्धेचा कालावधी व स्पर्धा कार्यक्रमाचे पत्र जिल्हा संघटनेला अधिकृतपणे प्राप्त झाले, असे प्रा. गाडे यांनी सांगितले. २० मार्च -संघ आगमन व नोंदणी २१ मार्च रोजी दुपारी ४ वाजता उद्घाटन, २२ मार्च रोजी साखळी सामने, सांयकाळी ५ ते रात्री १० होणार आहे. २३ मार्च रोजी बाद फेरीचे सामने सायंकाळी ५ ते रात्री १० पर्यंत, तर २४ मार्च रोजी उपात्य फेरी व अंतिम फेरी, दि. २५ रोजी पारितोषिक वितरण सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेच्या दरम्य़ान होणार आहे.