पुणे – शहरातील नद्यांच्या पर्यावरणीय पुनरुज्जीवनासाठी एकत्र आलेल्या ६० हून अधिक संस्था आणि व्यक्तींची संघटना पुणे नदी पुनरुज्जीवन (पीआरआर) भीमा खोऱ्यातील मुळा, मुठा, रामनदी, पवना, इंद्रायणी, भामा आणि भीमा या ७ नद्यांसाठी ‘राइट्स ऑफ रिव्हर्स मोहीम सुरू करणार आहे.
ही मोहीम दि. २६ जानेवारी ते २८ जानेवारी २०२४ पर्यंत सुरू असेल. नद्यांचे हक्क, माझी जबाबदारी याची जाणीव ठेवत पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील ७ नद्यांसाठी राइट्स ऑफ रिव्हर्स मोहीम राबवण्यात येणार असून, त्यासाठी भारताचे वॉटरमॅन राजेंद्र सिंग, आंतरराष्ट्रीय नदी तज्ज्ञ परिणीता दांडेकर सहभागी होणार आहेत. अशी माहिती पुणे नदी पुनरुज्जीवन संस्थेच्या वतीने शनिवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
प्रजासत्ताक दिनी अर्थात दि. २६ जानेवारी हा भारतीय राज्यघटना साजरी करण्याचा दिवस. आपण जगातील अशा मोजक्या देशांपैकी एक आहोत जिथे संविधानाने हे मान्य केले आहे की स्वच्छ आणि सुरक्षित नैसर्गिक वातावरण हे नागरिकांच्या जीवनाच्या अधिकाराचा एक भाग आहे आणि ते राखणे हे देखील नागरिकांचे कर्तव्य आहे.
हे लक्षात घेऊन, जीवितनदी, एन. ए. पी. एम., जलबिरादरी, जलदिंडी प्रतिष्ठान, नमामी इंद्रायणी प्रतिष्ठान, श्री आळंदी धाम सेवा समिती, मनहर्ष फाउंडेशन, रंजाई, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी, निसर्गसेवक, सजग नागरिक मंच आणि इतर अनेक संस्थांद्वारे ही मोहीम एकत्रितपणे राबवली जाणार आहे.