बीजिंग: चीनमधील वुहान शहरामध्ये करोनाची साथ आटोक्यात आली असली तरी देशाच्या ईशान्येकडे रशियाच्या सीमेलगतच्या भागात करोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा होण्याची चिन्हे दिसायला लागली आहेत. त्यामुळे या भागात नव्याने निर्बंध लादले जायला लागले आहेत.
होलोंगजियांग प्रांतात हा धोका सर्वाधिक प्रमाणात जाणवायला लागला आहे. या प्रांतात बाहेरून आलेल्या करोनाबाधितांमुळे स्थानिकांना संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या प्रांतात संसर्ग वाढल्याची एकापाठोपाठ एक अनेक उदाहरणे दिसायला लागली आहेत. या प्रांताची राजधानी हार्बिन इथे करोना प्रभाव असलेली दोन क्षेत्रे आहेत. तेथे स्थानिक रुग्णालयांमध्ये केवळ करोनाच्या रुग्णांवरच उपचार सुरू आहेत. या प्रांताबाहेरील वाहने आणि व्यक्तींनी रहिवासी क्षेत्रात प्रवेशाला मज्जाव करण्यात आला आहे.
चीनबाहेरून आलेल्या किंवा अन्य हॉटस्पॉट झोनमधून या प्रांतामध्ये आलेल्या कोणाही व्यक्तीने या भागात प्रवेश केल्यास त्याला क्वारंटाईन केले जाते आहे. या भागात आलेल्या कोणालाही मास्क घालणे बंधनकारक आहे आणि त्या व्यक्तीचे शारीरिक तापमान त्वरित तपासले जात आहे. त्या व्यक्तीच्या मोबाइल फोनमध्ये “ग्रीन हेल्थ कोड’ हे ऍप असणे अनिवार्य आहे. या भागातील विद्यार्थ्यांना देशाच्या अन्य भागातील शाळा, कॉलेज आणि अन्य विद्यापीठांमध्ये न जाण्याच्या सूचना केल्या गेल्या आहेत.
आतापर्यंत या प्रांतात 537 रुग्ण आढळले आहेत. त्यातील 384 जण अन्य प्रांतांमधून आलेले आहेत, असे राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे.