पाटणा: बिहारमधील भाजपच्या एका आमदाराला राज्याबाहेर प्रवास करण्यासाठी पास देणे एका वरिष्ठ अधिकाऱ्याला महागात पडले आहे. त्या अधिकाऱ्यावर बिहार सरकारने निलंबनाची कारवाई केली आहे.
अन्नू कुमार असे निलंबित करण्यात आलेल्या उपविभागीय अधिकाऱ्याचे नाव आहे. कुमार यांनी भाजपचे आमदार अनिल सिंह यांना बिहारबाहेर प्रवास करण्यासाठी पास दिला. त्याआधारे सिंह राजस्थानच्या कोटामध्ये पोहचले. तिथे शिक्षणासाठी राहत असलेल्या कन्येला घेऊन ते बिहारमध्ये परतले. त्या घडामोडीवरून बिहारमधील राजकारण तापले.
कोटामधून आपल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने विशेष बसेसची व्यवस्था केली होती. त्यावर स्वत: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आक्षेप घेतला होता. उत्तरप्रदेशची कृती देशव्यापी लॉकडाऊनच्या नियमांचा भंग करणारी आहे, अशा आशयाची प्रतिक्रिया नितीश यांनी दिली होती. त्याचा आधार घेऊन बिहारमधील विरोधी पक्षांनी भाजपच्या आमदाराला पास देण्याच्या कृतीवर टीकेची झोड उठवली. त्यामुळे पास जारी करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करणे बिहार सरकारला भाग पडले.
दरम्यान, आमदार सिंह यांच्या वाहन चालकालाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. परवानगीविना बिहारबाहेर वाहन नेल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. आता आमदार सिंह यांच्याबाबत सरकार काय पाऊल उचलणार याविषयी उत्सुकता आहे.