- पवना बॅकवॉटर परिसरातील “हॅंगआऊट’मध्ये “एनसीबी’चे पथक
- अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण
पवनानगर – अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्ती हिला ड्रग्ज सेवनासह अन्य आरोपांखाली मंगळवारी (दि. 8) अमली पदार्थविरोधी विभागाने (एनसीबी) अटक केली. रियाच्या अटक कारवाईनंतर मुंबई येथून “एनसीबी’चे एक पथक लोणावळ्याजवळील सुशांतसिंह आणि रिया चक्रवर्ती यांची ये-जा असलेल्या “हॅंगआऊट व्हिलामध्ये आज दाखल झाले. सुशांतसिंह या फार्महाऊसमध्ये ये-जा करत असल्याची बाब यानिमित्ताने उघड झाली आहे.
सुशांतसिंह राजपूत सिंग याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र ही हत्या आहे की आत्महत्या यावरून चांगलेच राजकारण पेटले आहे. आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच सुशांतसिंह “ड्रग्ज कनेक्शन’प्रकरणी आज रियाला “एनसीबी’ने अटक केली आहे.
दरम्यान, पवना बॅकवॉटर परिसरात हॅंगआऊट हे फार्महाऊस अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने दोन वर्षांसाठी भाडेतत्वावर घेतले होते, अशी माहिती समोर येत आहे. तसेच तो अनेकदा “रिलॅक्स’ होण्यासाठी याठिकाणी यायचा अशी माहिती समजली आहे. तसेच त्याच्या आत्महत्येनंतर हॅंग आऊट व्हिलामधील व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. बऱ्याचदा सुशांतसिंह याच्यासोबत रिया आल्याचेही सांगण्यात येत आहे.
रियावरील कारवाईनंतर मुंबई येथून अमलीपदार्थ विरोधी पथक हे थेट सुशांतसिंह राजपूतची ये-जा असलेल्या लोणावळा येथील पवना धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील हॅंगआऊट या फार्म हाऊसवर पोहोचले. दुपारपासून हॅंगआऊट व्हिला येथे तपासणी सुरू केली. यामधून काही धागेदोरे मिळताहेत का हे पथक तपासून पाहत आहे. रात्री उशिरापर्यंत या फार्महाऊसवर तपासणी सुरू होती. याशिवाय या पथकाने माध्यमांशी बोलण्यास नकार देत फार्महाऊसमध्ये प्रवेशास माध्यमांच्या प्रतिनिधींना मज्जाव केला. आता “एनसीबी’च्या पथकाला हॅंगआऊटमधून काय धागेदोरे मिळतात हे पाहणे महत्वाचे आहे.