पेशावर (पाकिस्तान) – पाकिस्तानमधील झियारत डोंगररांगांमधील प्रसिद्ध संगमरवराच्या खाणीचे 6 युनिट आज कोसळले. या दुर्घटनेमध्ये किमान 19 जण ठार झाले असून कित्येकजण जखमी झाले आहेत. खाणीमध्ये अनेक जण अडकून पडले असल्याचीही भीती व्यक्त होत आहे. डोंगराचा मोठा भाग खचला आणि खाणीमध्ये हा भूभाग कोसळला.
ही दुर्घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. त्यामध्ये 12 खाणकामगार जागीच मरण पावले, असे पाकिस्तानातील स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. जखमी झालेल्या 7 कामगारांचा आज जिल्हा मोहम्मद रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दुर्घटनेत जखमी झालेल्यांमध्ये खाणकामगारांबरोबर खैबर पख्तुनवा साफी गावातल्या टेकडीवरच्या काही पर्यटकांचाही समावेश आहे. हे ठिकाण प्रांतीय राजधानी पेशावरपासून 85 किलोमीटरवर आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली 15-20 जण गाडले गेल्याची शक्यता आहे, असे जिल्हा पोलीस अधिकारी मोहमंद तारिक हबीब यांनी सांगितले.
माती हटवण्यासाठी अवजड यंत्रे मागवली गेली असून अंधारामुळे बचावकार्य थांबवावे लागले असल्याचेही त्यांनी सांगितले. मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता उपायुक्त इफ्तेकार आलम यांनी सांगितले. दुर्घटना घडली तेव्हा खाणीमध्ये 45 कामगार काम करत होते. त्यापैकी 9 जणांना वाचवण्यात यश आले आहे.