पुणे – पीएमपीच्या बसेसमध्ये प्रवास करताना अनेक चोऱ्यांचे प्रकार घडतात. मात्र मागील आठवड्यात प्रवाशाचे सोन्याचे दागिने लुटून पोबारा करण्याचा प्रयत्न वाहकामुळे फसला. वाहकाच्या या कामगिरीमुळे बसमध्ये होणारी चोरी टळली असून, संबंधिताला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या न.ता.वाडी आगाराचे वाहक मधुकर गायकवाड हे 10 नोव्हेंबर रोजी मनपा ते तळेगाव ढमढेरे या मार्गावर कर्तव्य बजावत होते.
दरम्यान, वाघेश्वर मंदिराजवळ दुपारी 4 च्यादरम्यान चोरट्याने प्रवाशाकडील 1 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या तीन तोळ्यांच्या ब्रेसलेटची चोरी करून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्यावेळी बसमधील इतर प्रवाशांनी आरडाओरड केली. चोरटा पोबारा करण्याच्या तयारीत असतानाच गायकवाड यांनी प्रसंगावधान दाखवत चोरट्याला पकडले.