पुणे – पावसाने विश्रांती घेताच शहरात उकाडा वाढला. बुधवारी (दि. 4) दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरण होते. तर मागील दोन दिवसांत शहरातील कमाल तापमानात तब्बल 5 अंश सेल्सियसने वाढ झाली आहे. या अचानक वातावरण बदलामुळे दिवसभर पुणेकर उकाड्याने हैराण झाल्याचे चित्र आहे.
शहरात दि. 2 ऑक्टोबरला 27 अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. पावसाच्या सरी आणि हवेतील गारवा यामुळे कमाल तापमानात घट झाली. मात्र, अवघ्या 48 तासांत (दि.4) कमाल तापमान 33 अंश सेल्सियसवर पोहचले. ही ऑक्टोबर हिटची चाहुल मानली जाते आहे.
दरम्यान, पुढील दोन दिवसांत शहरातील कमाल तापमान 32 ते 34 च्या आसपास असेल. असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत परतीचा पाऊस झाल्यास तापमानात घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.