काबूल- आम्हाला जगातील सर्वच देशांशी चांगले संबंध हवे आहेत. आमचा अमेरिकेशीही आता काहीवाद नाही. अमेरिका आणि अन्य देशांनी आम्हाला आता दहा अब्ज डॉलर्सची मदत करावी त्यांच्या मदतीची आम्हाला अत्यंतिक गरज आहे असे अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे विदेश मंत्री अमीर खान मुत्तकी यांनी म्हटले आहे.
असोसिएटेड प्रेसला त्यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे प्रतिपादन केले आहे. अफगाणिस्तानवरील निर्बंध उठवले जावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे या निर्बंधांचा काहीं एक उपयोग नाही असे त्यांनी म्हटले आहे.
अफगाणिस्तान सरकार मुलींना शिक्षण आणि महिलांना रोजगार देण्याच्या संबंधात वचनबद्ध आहे असेही त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, आज अफगाणि नागरीक हालाकिच्या स्थितीत आहेत. अफगाणिस्तान कमकुवत आणि नाजूक राहणे हे जगाच्याही हिताचे नाही.
महिलांना प्राधान्य देण्याच्या संबंधातील आमची पुर्वीची भूमिका आता आम्ही बदलत आहोत असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. आम्ही आता आमच्या प्रशासनातही बदल करीत असून जगाशीही संपर्क वाढवत आहोत असे ते म्हणाले. आम्ही येथे नव्याने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर आमच्या हातून सुरूवातीला काही चुका झाल्या पण त्यात आता आम्ही सुधारणा करीत आहोत असेही त्यांनी नमूद केले. तथापि नेमक्या काय चुका झाल्या या माहितीचा उल्लेख मात्र त्यांनी टाळला.