नवी दिल्ली – अमेरिका आणि अन्य १२ देशांच्या आघाडीने इशारा दिल्यानंतरही हौथी बंडखोरांकडून तांबड्या समुद्रामध्ये व्यापारी जहाजांवर हल्ले केले जाणे सुरू ठेवण्यात आले आहे. शनिवारी हौथी बंडखोरांनी जमिनीवरून डागल्या जाणाऱ्या ड्रोनचा वापर केला. गाझा युद्धामुळे जहाजांवरचे हल्ले सुरू झाल्यापासून हौथींकडून अशी ड्रोन पहिल्यांदाच वापरली गेली आहेत. हौथींचे हल्ले कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याचे अमेरिकेच्या नौदलाच्या कमांडरनी म्हटले आहे. येमेनच्या भूमीवरून डागण्यात आलेले ड्रोन आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावर थेट हल्ल्याच्या उद्देशानेच सोडण्यात आले होते. हे ड्रोन नंतर हवेतच नष्ट करण्यात आले, असे अमेरिकेच्या नौदलाचे कमांडर व्हाइस ऍडमिरल ब्रॅड कूपर यांनी म्हटले आहे.
हे ड्रोन नक्की कोणत्या जहाजाला लक्ष्य करण्यासाठी डागले गेले होते, हे समजू शकलेले नाही. या ड्रोनमुळे कोणत्याही जहाजाचे नुकसान झाले नाही, असेही त्यांनी सांगितले.
दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेच्या नेत्त्वाखालील १२ देशांच्या आघाडीने लाल समुद्रात व्यापारी जहाजांवर हल्ले न करण्यासंदर्भात हौथी बंडखोरांना इशारा दिला होता. हौथींनी हे हल्ले थांबवले नाही, तर त्यांना परिणाम भोगायला लागतील, असे या आघाडीने म्हटले होते. शनिवारी झालेला हल्ला हौथींकडून १८ नोव्हेंबरपासून तांबड्या समुद्रात केलेला २५ वा हल्ला होता. या हल्ल्यांमुळे अमेरिकेला आंतरराष्ट्रीय सागरी मार्गाचे संरक्षण करण्यासाठी बाब-एल-मान्देब खाडीजवळ नौदल तैनात करण्यास भाग पाडले गेले आहे, असे ब्रॅड कूपर यांनी म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय आघाडीची व्याप्ती आणखीन वाढली
आंतरराष्ट्रीय जलमार्गाच्या संरक्षणासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्ड या नावाने साकारण्यात आलेल्या आघाडीमध्ये आता २२ देश सहभागी झाले आहेत. या आघाडीने आताप्रयंत येमेनच्या भूमीवरून डागलेली १९ ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडली आहेत. या शिवाय हौथींच्या ३ नौकाही बुडवण्यात आल्या आहेत.