दूध, धान्य, भाजीपाला, डाळी मिळणार : विभागीय आयुक्त
पुणे – धान्य, भाजीपाला, दूध अशा जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद ठेवणे शक्य नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कोणत्याही परिस्थितीत सुरळीत ठेवण्याबाबतच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या आहेत.
विभागीय आयुक्त कार्यालयात विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस पणन विभागाचे संचालक सुनील पवार, सहसंचालक विनायक कोकरे, अन्न विभागाचे सहआयुक्त एस.एस देशमुख, औषध प्रशासनाचे सहआयुक्त एस.बी. पाटील, सहायक पुरवठा अधिकारी सुनंदा भोसले- पाटील उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत करोनामुळे वस्तूंचा तुटवडा व जीवनावश्यक वस्तूजादा दराने विक्री होण्याची भीती आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू सुरळीत व रास्त भावात उपलब्ध होणे गरजेचे आहे. पणन विभागाने जीवनावश्यक दूध, धान्य, भाजीपाला, तूरडाळ, कांदा, बटाटा, लसूण आदी जीवनावश्यक वस्तू सुरळीतपणे नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात, यासाठी नियंत्रण ठेवावे. अन्न व प्रशासन विभागाने श्वसनासंबंधी आजारांवरील औषधांचा तुटवडा भासणार नाही, याकडे लक्ष द्यावे.
हॉटेलमधून ग्राहकांना पार्सल देण्यास परवानगी
पुणे शहरात विद्यार्थ्यी, नोकदार वर्गाची संख्या मोठी आहे. अनेक नागरिकांची घरामध्ये जेवणाची सोय नसते. त्यामुळे अशा नागरिकांना हॉटेल अथवा मेसवर अवलंबून रहावे लागते. मात्र, जिल्हा प्रशासनाने हॉटेल बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. याविषयी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना विचारले असता ते म्हणाले की, हॉटेलमध्ये ग्राहकांना बसण्यास मनाई आहे. मात्र, हॉटेलमधून ग्राहकांना पार्सल देण्यास परवानगी आहे. दरम्यान पोलिस उपायुक्त मितेश गिट्टे यांनीही हॉटेलमधून फक्त जेवणाचे पार्सल देण्याऱ्या चालकांवर कारवाई करण्यात येणार नसल्याचे यावेळी स्पष्ट केले.
किराणा दुकाने सुरू राहणार
शहरातील व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनी विभागीय आयुक्त यांची भेट घेऊन किराणा साहित्याची दुकाने बंद ठेवण्याचा अथवा फक्त एक तास उघडी ठेवण्याचा विचार असल्याचे सांगितले, यावर विभागीय आयुक्त यांनी सांगितले की, जर एक तास किराणाची दुकाने उघडी ठेवल्यास त्यावेळी दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी होईल. त्यामुळे किराणा साहित्याची दुकाने उघडी ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.